__________________________________

Friday

सामान्य जनतेचा कारखाना....

नुकतीच एक बातमी वाचली, तुम्हीही वाचली/ऐकली असेल.. गरवारे नॉयलॉन्स कंपनीबद्दल...

ही कंपनी सुमारे बारा वर्षांपासून बंद पडलेली आहे. management चे प्रश्न आणि ते सोडवण्याची अनासक्ती या दोन प्रमुख कारणांमुळे कंपनीचे अगदी थोडक्यात सांगायचे तर दिवाळे निघाले. जवळजवळ बाराशे कामगार आणि त्यांची कुटुंबे या कारखान्यावर अवलंबून होती. कंपनी बंद पडणार हे लक्षात येताच सगळ्यांचे धाबे दणाणले. "आता पुढे काय?" असा जीवनमरणाचा प्रश्न आऽऽ वासून त्यांच्या समोर उभा राहिला.

जे सर्वसामान्यपणे शहाणे होते, ते आधीच निघाले होते...जे थोडे उशीरा जागे झाले, त्यांनी भराभर निर्णय घेत पुढची व्यवस्था केली.... आणि मार्गस्थ झाले....राहता राहिले दोनशे दहा. यांना आपण काय म्हणायचे? शहाणे की वेडे?

बहुतेक प्रश्नांची उत्तरे कालौघात मिळतात असे म्हणतात.. फक्त वाट पाहण्याची तयारी पाहिजे. पण इथे त्याचीही गरज नव्हती. समोरचा अंधार स्पष्ट दिसत होता. तिकडे वाट चालणारे हे निव्वळ वेडे ठरणार होते.

पण काही लोकांना वेडेपणा करायला आवडतो.....

या दोनशे दहा जणांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला...निर्णय असा झाला, की धीर सोडायचा नाही आणि अखेरपर्यंत प्रयत्‍न करायचे. त्यासाठी त्यांनी ‘सामान्य जनतेची आघाडी’ स्थापन केली.

कंपनीचा लिलाव होणार असल्याचे कळले....

लोक पुन्हा जमले....अक्षरशः उधा‌रउसनवार करून त्यांनी पैसा जमवला. लिलावात भाग घेतला. लिलाव झाला...किंमत ठरली ६.०१ कोटी रूपये....पैसे भरण्याची मुदत आणि हप्ते ठरवून मिळाले...लोकांनी अजून जोर लावला.... आणखी पैसे जमविले....

दिनांक ४ नोव्हेंबर २००८ ला ‘सामान्य जनतेच्या आघाडी’ने शेवटचा हप्ता, ९४ लाखांचा, जमा करून कंपनीचा ताबा मिळवला....कारखान्याचे नवीन नाव ठरले, "सामान्य जनतेचा कारखाना". एकजुटीचा विजय झाला...१२ वर्षांचे तप फळले....

बहुतेक प्रश्नांची उत्तरे कालौघात मिळतात असे म्हणतात.. फक्त वाट पाहण्याची तयारी पाहिजे....

.....खरे आहे!


स्वरभास्कर....



पंडीतजींना ‘भारतरत्‍न’ जाहीर झाले....कालच्या दिवसाची सर्वांत सुखद बातमी....

खरे सांगायचे तर हा सन्मान मुख्यत्वे त्या पुरस्काराचाच आहे, असे मला वाटते. तुम्ही सांगा, पंडीतजींना तो पुरस्कार मिळाला काय किंवा नाही मिळाला काय (शुभ बोल नार्‍या...), त्यांना किंवा त्यांच्या असंख्य चाहत्यांना काहीही फरक पडत नाही. पण, ‘भारतरत्‍न’ मिळालेल्या असामान्य व्यक्तींच्या यादीत जर "पं. भीमसेन जोशी" हे नाव नसेल, तर ती यादीच अपूर्ण आहे, असे वाटत राहते. खरे की नाही?

काय बोलणार मी त्यांच्यावर ? दोन गोष्टी आहेत, एक - माझी पात्रता नाही आणि दोन - माझी खरंच पात्रता नाही.

पंडीतजींनी आपली संगीतसाधना कशी सुरू केली, किती कष्ट उपसले...हे अस्सल सोने किती तावूनसुलाखून लखलखले आहे, हे सर्वजण जाणतातच...पण आज हिमालयापेक्षाही जास्त उच्चस्थानावर पोहोचलेला हा माणूस ज्यावेळी स्वतःला ‘भारतरत्‍न’ मिळाल्याची बातमी ऐकतो, तेव्हा ‘हा किराणा घराण्याचा सन्मान आहे.’ (माझा एकट्याचा नाही) असे त्यांना  म्हणावेसे वाटते. 

"विद्या विनयेन शोभते" याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण असू शकेल काय?

तुम्हीच सांगा....

Wednesday

कालचा विषय पुढे....





तर काल मी असे म्हणत होतो, की सा रे ग म प हा जो कार्यक्रम आहे, त्यात सध्या लहान मुलांची स्पर्धा सुरू आहे (बहुतेकांना हे माहीत आहेच...). काय मुले गातात जबरदस्त....मी तर फिदा झालो...

केवळ वय लहान म्हणून कौतुक नाही. खरंच ही मुले मस्त गातात. एवढ्याशा वयात ही गाणे म्हणायला शिकली कधी, हाच मला प्रश्न पडतो. काही असो, ऐकायला तर झकास वाटते हे खरे.

पण अधिक प्रमाणात talent असले काही चुकीची परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते हे पहा.

थोडा खोलात जाऊन विचार केला की आणि प्रश्न निर्माण होतात. म्हणजे, आता ही मुले इतकी गुणी आणि brilliant आहेत, हे शंभर टक्के खरे. परंतु, यांच्या ‌दृष्टीने ही केवळ "आणखी एक स्पर्धा" असे नसेल कशावरून? या सर्व मुलामुलींमध्ये talent ठासून भरलेले आहे हेही लगेच जाणवते. अर्थातच, ही मुले त्यांच्या शैक्षणिक बाबतींतही तितकीच हुशार असणार आहेत...आणि आपण आत्ता कितीही उदोउदो केला तरी चाकोरीबद्ध शिकून नोकरी करणे / आपल्या पायांवर उभे राहणे, यालाच आपल्याकडे यशस्वी जीवन समजले जाते. अशा परिस्थितीत जर ही मुले पुढे जाऊन गायनात करिअर करणार काय? This is the big question...करणार असतील तर त्यासारखे दुसरे काही नाही. पण ही शक्यता ५% पण नाही असे मला वाटते. त्यामुळे, फक्त "आणखी एक बक्षिस" मिळवायचे, घरी जायचे, शोकेसमध्ये लावायचे आणि "आता फार अभ्यास बुडालाय...आता सर्व बंद...गाण्याचा क्लाससुध्दा.." हेच होणार असेल..तर मग का करायचा सगळा अट्टाहास? फक्त पालकांची कॉलर ताठ करायला?

हा त्या मुलांच्या मेहनतीवर अन्याय आहेच, पण दैवदत्त देणगीवरही आहे.

या सगळ्याचा दुसरा एक पैलूपण आहे. वास्तविक, या कार्यक्रमाचा हेतू होतकरू कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे, जे लोक या कलेसाठी serious असतील, त्यांनी यात यश मिळवणे हे जास्त चांगले नाही का? only for example, ती धिटुकली मुग्धा खच्चून sms मिळवती आहे. बहुतेक ती ’जनाधारा’वर स्पर्धा जिंकेल असा माझा अंदाज आहे. उद्या ती मोठी झाल्यावर तिच्या पालकांनी तिला समजा Biotechnologist केले तर, खरा अन्याय होतो, तो जी दुसरी धिटुकली आहे, कार्तिकी, तिच्यावर. कारण तिला गाण्यात करिअर करायचे असते, पण स्पर्धा न जिंकल्यामुळे तिने नाउमेद हो‍ऊन तो नाद सोडलेला असतो.

This becomes an Anti Win-Win situation...

हे झाले केवळ उदाहरणापुरते. असेच होईल असेही नाही, पण नाहीच होणार असेही नाही. देवाकडे एवढेच मागणे (जे ज्ञानदेवांनी सांगून ठेवले आहे), "जो जे वांछील, तो ते लाहो...." आपण सध्या गाणी ऐकावीत आणि त्यांचा लुत्फ घ्यावा...जास्त विचार केला की जास्त त्रास होतो.


Tuesday

सा रे ग म प...Little Champs

या सारेगमप कार्यक्रमामुळे सोमवार आणि मंगळवारी इतका उशीर होतो की काही लिहायला होत नाही...त्यामुळे, लोकहो, माझा ब्लॉगवरपण ५ दिवसांचा आठवडा असणार आहे....

आता उद्या भेटूत...उद्या मी हाच विषय continue  करेन...

Sunday

माझ्या आयुष्यातला जम्बो....




अनिल कुंबळेने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली... एक पर्व संपले. भारतीय क्रिकेटचा ‘जम्बो’ अध्याय संपला. 






कुंबळे हा खेळाडू पहिल्यांदा मी पाहिला तेव्हाच तो मला फार आवडला होता. त्याचे 
कारण म्हणजे, त्यावेळी तो चष्मा लावून क्रिकेट खेळत असे. मलाही त्यावेळी नुकताच चष्मा लागलेला होता. इतक्या लहानपणी घडलेली (वय वर्षे ७) ही माझ्या आयुष्यातली फार मोठी घटना होती आणि अर्थातच मला त्याचा बर्‍यापैकी धक्का बसला होता. सांगायचा मुद्दा हा, की कूंबळेला चष्मा असल्याने, तो नेहमी मला ‘माझ्या गटातला’ वाटत असे. त्याचे क्रिकेट skills हा गौण घटक होता.

नंतर १-२ वर्षांत मला थोडे क्रिकेट समजू लागले, त्यावेळी हा माणूस, इतका उंचापुरा, भक्क्म असूनदेखील, Spin Bowling का करतो? हा प्रश्न मला सतावत होता. कारण, spin bowling ही तब्येतीने किरकोळ (किंवा स्थूल) असलेल्या लोकांची मक्तेदारी आहे, अशी माझी समजूत होती (त्यांना जास्त धावायला जमत नाही, हे स्वतःच देलेले कारण). पण कुंबळेला पाहून (आणि तो माझ्या गटातला असल्याने), मी शाळेत किंवा सोसायटीत संधी मिळेल तशी spin bowling टाकायचा प्रयत्‍न करत असे.

यानंतरच्या काळात कुंबळेची action जरी spinner ची असली तरी त्याचे बॉल वळतच नाहीत, असे कु्ठूनसे कळले. शिवाय spinner च्या मानाने त्याचे चेंडू खूप वेगवान असतात, तसेच त्याच्या घरच्या संघाकडून (कर्नाटक) तो वेगवान गोलंदाजी करतो, हेही समजले. खरे सांगायचे तर त्यावेळी तो जरासा मनातून उतरला. या खप्पामर्जीचे कारण आजही मला नीटसे माहित नाही. पण तरीही त्याचा चष्मा हा माझा weak point होताच.

साधारण, मी सहावी-सातवीत असताना माझी संगणक या प्रकाराशी ओळख झाली. आणि पुढे १-२ वर्षांत असे समजले की कुंबळेचे टोपणनाव "जम्बो" असून तो Software Engineer आहे. (जवागल श्रीनाथसारखा...). हे कळताच, कुंबळेचे माझ्या मनातील स्थान खूपच उंचावले गेले. कारण...त्यावेळी मीपण असे ठरविले होते की आपण software programming मध्ये करीअर करायचे...

पुढे माझे plans बदलत गेले, तसेच माझे क्रिकेटप्रेमही कमी झाले...(फॉर्म्युला वन, WWF यांनी वेड लावले होते). पण त्याच दरम्यान त्याने लाखांत एक अशी एका डावात १० बळींची कामगिरी केली. मी परत त्याला follow करू लागलो.

नंतर जम्बोची कामगिरी म्हणजे नुसते एकावर एक विक्रम चढत गेले. २०० बळी, ३०० बळी, ४०० बळी, कपिलदेवला मागे टाकले, ५०० बळी इ. नुसत्या खचाखच बातम्या येत होत्या. एक आठवते, या काळात कुण्या एका पत्रकाराने त्याला त्याच्या ‘न वळणार्‍या’ फिरकी गोलंदाजीबद्दल छेडले होते, जम्बो शांतपणे म्हणाला, "या गोलंदाजीनेच मी आतापर्यंत ३०० हून अधिक विकेट्स काढल्या आहेत, अजूनही तितक्याच काढेन..."

Meanwhile, त्याने (आणि योगायोगाने मीही)  चष्मा सोडून कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायला सुरुवात केली होती. (नंतर मी परत चष्मा सुरू केला, हा भाग वेगळा.)

आज त्याने बरीचशी अपेक्षित पण काहीशी अकस्मात निवृत्ती जाहीर केली, त्यावेळी त्याच्या नावावर ६१९ बळींची नोंद आहे. त्याने आपले वाक्य खरे करून दाखवले. भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज हे त्याचे स्थान लवकर धोक्यात येईल असे वाटत नाही.

जाता जाता शेवटचे. गेल्या वर्षी जम्बोने Oval वर शतक झळकावले. त्यावेळी आम्हा दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. तो तिथे मैदानावर जवळजवळ नाचला होता....आणि मी इथे भारतात ‘अरे लय भारी’ असे म्हणत त्याचा वॉलपेपर Desktop ला लावला होता...(Normally, I'm against any kind of celebrity wallpapers)

असो. एक दैदीप्यमान पर्व आज संपले. असा अंतर्बाह्य क्रिकेटर (आठवा : जबडा फ्रॅक्चर झालेला असताना त्याने केलेली गोलंदाजी...) फार दुर्मिळ असतो.

Thank you Jumbo for all the best cricket you offered us, thank you personally for being with me. Best of Luck for your future life...


Saturday

दिवाळीचे Aftermaths - भाग २

काल Aftermaths मध्ये थोडे दुःख व्यक्त करून झाले, आज काही मजेदार आणि सुखद गोष्टी पाहू.

दिवाळी आली की आमचे डॉक्टरकाका खूष असतात. कारण उघड आहे; दिवाळीमध्ये किंवा better said दिवाळीनंतर लोकांच्या तब्येती बिघडायला सुरू होते. बदललेली हवा, थंडी या गोष्टी आहेतच, परंतु भरपूर आग्रहाला बळी पडून केलेला बेदम फराळ हे मुख्य कारण आहे. काका म्हणतात, की काही वर्षापूर्वी केवळ फराळ आणि त्यामुळे झालेले विविध परिणाम या केसेस असत. आता मात्र यात (सुध्दा) Variety आलेली आहे. म्हणजे कसे, तर सुमारे १० वर्षापूर्वी त्यांच्याकडे दिवाळीनंतर जे पेशंट येत, त्यांत मुख्यतः अपचन ही तक्रार असे, त्यानंतर घसा बसणे, सर्दी यांच क्रमांक असायचा. आज अपचन आपले स्थान टिकवून आहे, मात्र डोकेदुखी, कानदुखी आणि किरकोळ भाजणे (पुन्हा फटाके..दुसरे काय) यांनी घसा आणि नाक यांना मागे टाकले आहे, असे त्यांचे निरीक्षण आहे. त्यांची ही Comparison ऐकून मला तर फारच मौज वाटली.


दिवाळीनंतरचे काही दिवस हे दिवाळी अंकांचे असतात. सुटीच्या दिवशी दुपारी मस्त जेवण करावे आणि पलंगावर लोळत एखादा "आवाज", "जत्रा", "किस्त्रीम" किंवा "किशोर" वाचावा हे एक फार सुंदर वास्तव आहे. सोबत तोंडात टाकायला शिल्लक राहिलेला फराळ असतोच. हे अंक भरपूर मोठे असल्याने ते संपवण्यात एखाददोन महिने सहज जातात. दिवाळी अंकांचे वाचन हा आपल्या मध्यमवर्गी शहरी मराठी संस्कृतीचाच एक भाग बनलेला आहे.


असो. आता दिवाळी संपलेली आहे. उद्यापासून इतर विषयांकडे वळावे.


उद्या भेटूच परत...