Thursday, November 13, 2008

मिलते है ब्रेक के बाद...

ऑफिसच्या Load मुळे मी आजकाल फार दमतो... (हशा...)....
अहो खरंच! (जोरदार हशा....)
..शप्पथ!! (प्रचंड हशा...)

...त्यामुळे आठवडाभर blog पण लिहिला नाही. पण आपण लवकरच भेटू...
(टाळ्या आणि शिट्ट्या....)

Friday, November 7, 2008

सामान्य जनतेचा कारखाना....

नुकतीच एक बातमी वाचली, तुम्हीही वाचली/ऐकली असेल.. गरवारे नॉयलॉन्स कंपनीबद्दल...

ही कंपनी सुमारे बारा वर्षांपासून बंद पडलेली आहे. management चे प्रश्न आणि ते सोडवण्याची अनासक्ती या दोन प्रमुख कारणांमुळे कंपनीचे अगदी थोडक्यात सांगायचे तर दिवाळे निघाले. जवळजवळ बाराशे कामगार आणि त्यांची कुटुंबे या कारखान्यावर अवलंबून होती. कंपनी बंद पडणार हे लक्षात येताच सगळ्यांचे धाबे दणाणले. "आता पुढे काय?" असा जीवनमरणाचा प्रश्न आऽऽ वासून त्यांच्या समोर उभा राहिला.

जे सर्वसामान्यपणे शहाणे होते, ते आधीच निघाले होते...जे थोडे उशीरा जागे झाले, त्यांनी भराभर निर्णय घेत पुढची व्यवस्था केली.... आणि मार्गस्थ झाले....राहता राहिले दोनशे दहा. यांना आपण काय म्हणायचे? शहाणे की वेडे?

बहुतेक प्रश्नांची उत्तरे कालौघात मिळतात असे म्हणतात.. फक्त वाट पाहण्याची तयारी पाहिजे. पण इथे त्याचीही गरज नव्हती. समोरचा अंधार स्पष्ट दिसत होता. तिकडे वाट चालणारे हे निव्वळ वेडे ठरणार होते.

पण काही लोकांना वेडेपणा करायला आवडतो.....

या दोनशे दहा जणांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला...निर्णय असा झाला, की धीर सोडायचा नाही आणि अखेरपर्यंत प्रयत्‍न करायचे. त्यासाठी त्यांनी ‘सामान्य जनतेची आघाडी’ स्थापन केली.

कंपनीचा लिलाव होणार असल्याचे कळले....

लोक पुन्हा जमले....अक्षरशः उधा‌रउसनवार करून त्यांनी पैसा जमवला. लिलावात भाग घेतला. लिलाव झाला...किंमत ठरली ६.०१ कोटी रूपये....पैसे भरण्याची मुदत आणि हप्ते ठरवून मिळाले...लोकांनी अजून जोर लावला.... आणखी पैसे जमविले....

दिनांक ४ नोव्हेंबर २००८ ला ‘सामान्य जनतेच्या आघाडी’ने शेवटचा हप्ता, ९४ लाखांचा, जमा करून कंपनीचा ताबा मिळवला....कारखान्याचे नवीन नाव ठरले, "सामान्य जनतेचा कारखाना". एकजुटीचा विजय झाला...१२ वर्षांचे तप फळले....

बहुतेक प्रश्नांची उत्तरे कालौघात मिळतात असे म्हणतात.. फक्त वाट पाहण्याची तयारी पाहिजे....

.....खरे आहे!


स्वरभास्कर....



पंडीतजींना ‘भारतरत्‍न’ जाहीर झाले....कालच्या दिवसाची सर्वांत सुखद बातमी....

खरे सांगायचे तर हा सन्मान मुख्यत्वे त्या पुरस्काराचाच आहे, असे मला वाटते. तुम्ही सांगा, पंडीतजींना तो पुरस्कार मिळाला काय किंवा नाही मिळाला काय (शुभ बोल नार्‍या...), त्यांना किंवा त्यांच्या असंख्य चाहत्यांना काहीही फरक पडत नाही. पण, ‘भारतरत्‍न’ मिळालेल्या असामान्य व्यक्तींच्या यादीत जर "पं. भीमसेन जोशी" हे नाव नसेल, तर ती यादीच अपूर्ण आहे, असे वाटत राहते. खरे की नाही?

काय बोलणार मी त्यांच्यावर ? दोन गोष्टी आहेत, एक - माझी पात्रता नाही आणि दोन - माझी खरंच पात्रता नाही.

पंडीतजींनी आपली संगीतसाधना कशी सुरू केली, किती कष्ट उपसले...हे अस्सल सोने किती तावूनसुलाखून लखलखले आहे, हे सर्वजण जाणतातच...पण आज हिमालयापेक्षाही जास्त उच्चस्थानावर पोहोचलेला हा माणूस ज्यावेळी स्वतःला ‘भारतरत्‍न’ मिळाल्याची बातमी ऐकतो, तेव्हा ‘हा किराणा घराण्याचा सन्मान आहे.’ (माझा एकट्याचा नाही) असे त्यांना  म्हणावेसे वाटते. 

"विद्या विनयेन शोभते" याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण असू शकेल काय?

तुम्हीच सांगा....