नुकतीच एक बातमी वाचली, तुम्हीही वाचली/ऐकली असेल.. गरवारे नॉयलॉन्स कंपनीबद्दल...
ही कंपनी सुमारे बारा वर्षांपासून बंद पडलेली आहे. management चे प्रश्न आणि ते सोडवण्याची अनासक्ती या दोन प्रमुख कारणांमुळे कंपनीचे अगदी थोडक्यात सांगायचे तर दिवाळे निघाले. जवळजवळ बाराशे कामगार आणि त्यांची कुटुंबे या कारखान्यावर अवलंबून होती. कंपनी बंद पडणार हे लक्षात येताच सगळ्यांचे धाबे दणाणले. "आता पुढे काय?" असा जीवनमरणाचा प्रश्न आऽऽ वासून त्यांच्या समोर उभा राहिला.
जे सर्वसामान्यपणे शहाणे होते, ते आधीच निघाले होते...जे थोडे उशीरा जागे झाले, त्यांनी भराभर निर्णय घेत पुढची व्यवस्था केली.... आणि मार्गस्थ झाले....राहता राहिले दोनशे दहा. यांना आपण काय म्हणायचे? शहाणे की वेडे?
बहुतेक प्रश्नांची उत्तरे कालौघात मिळतात असे म्हणतात.. फक्त वाट पाहण्याची तयारी पाहिजे. पण इथे त्याचीही गरज नव्हती. समोरचा अंधार स्पष्ट दिसत होता. तिकडे वाट चालणारे हे निव्वळ वेडे ठरणार होते.
पण काही लोकांना वेडेपणा करायला आवडतो.....
या दोनशे दहा जणांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला...निर्णय असा झाला, की धीर सोडायचा नाही आणि अखेरपर्यंत प्रयत्न करायचे. त्यासाठी त्यांनी ‘सामान्य जनतेची आघाडी’ स्थापन केली.
कंपनीचा लिलाव होणार असल्याचे कळले....
लोक पुन्हा जमले....अक्षरशः उधारउसनवार करून त्यांनी पैसा जमवला. लिलावात भाग घेतला. लिलाव झाला...किंमत ठरली ६.०१ कोटी रूपये....पैसे भरण्याची मुदत आणि हप्ते ठरवून मिळाले...लोकांनी अजून जोर लावला.... आणखी पैसे जमविले....
दिनांक ४ नोव्हेंबर २००८ ला ‘सामान्य जनतेच्या आघाडी’ने शेवटचा हप्ता, ९४ लाखांचा, जमा करून कंपनीचा ताबा मिळवला....कारखान्याचे नवीन नाव ठरले, "सामान्य जनतेचा कारखाना". एकजुटीचा विजय झाला...१२ वर्षांचे तप फळले....
बहुतेक प्रश्नांची उत्तरे कालौघात मिळतात असे म्हणतात.. फक्त वाट पाहण्याची तयारी पाहिजे....
.....खरे आहे!