आधी कात्रज.. नंतर मुंबई.. आणि त्यानंतर उत्तराखंड... देशाच्या दोन अत्यंत भिन्न भूप्रदेशात घडलेल्या तीन घटना... परंतु, एकमेकींत काही साम्य दाखविणाऱ्या... साम्य ते कसले? तर, निसर्गाच्या रौद्रावतारापुढे माणसाच्या यःकश्चितपणाचे, आधी मग्रुरी करण्याचे, बेपर्वाईचे, नंतर सपशेल शरणागतीचे आणि एकाअर्थी मानवाच्या या अत्याचारांना निसर्गाने दिलेल्या उत्तराचेही..
(छायाचित्र: रॉयटर्सच्या सौजन्याने) (Photo courtesy:Reuters)
रोज या घटना कमीअधिक प्रमाणात घडतच आहेत.. आज इथे तर उद्या तिथे तर परवा आणखी कुठेतरी.. काही कळतात.. बऱ्याच कळत नाहीत..
निमित्त झाले वळिवाच्या केवळ एका तुफान पावसाचे आणि पुण्यात कात्रज बोगद्याजवळ (शिंदेवाडी) हाहाकार माजला... फक्त एक पाऊस??? फक्त एका पावसाने डझनावारी गाड्या ओढून नेल्या.. दोन निष्पाप जीव प्राणाला मुकले... का?? तर आमच्या रस्त्यांशेजारचे चर ते पाणी वाहून नेण्यास असमर्थ ठरले.
माहीम/मुंब्रा/दहिसरला तेच! फक्त एक पाऊस अन् इमारत जमीनदोस्त.. २५-३० जण ठार (अधिकृत सरकारी आकडेवारी) आणि असेच कितीसेतरी जखमी..
उत्तराखंड प्रकरण तर अगदीच ताजे.. मान्सूनच्या नुसत्या सलामीने तिथे प्रलयसदृश परिस्थिती झाली. सरकारी आकडे काहीही सांगोत.. किमान १० ते १५ हजार मृत्यु व त्यापेक्षा जास्त जखमी व त्याहीपेक्षा जास्त विस्थापित अशी विदारक परिस्थिती या एका पावसाने तिथे आणली आहे. किमान २ ते ५ वर्षे हा भाग आता ’रिकव्हर’ होत राहील. पण तिथे नुकतीच आणखी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काय होणार हे आता देवालाच ठाऊक!
...जितका मी याच्यावर विचार करतो तितकं मला असं वाटत राहते की मानवाने निसर्गावर केलेल्या अपरिमित अत्याचारांचे हे निसर्गाने त्याच्या पद्धतीने दिलेले उत्तर आहे.
अगदी नुकत्याच तिथे गेलेल्या लोकांपासून ते पिढ्यानपिढ्या तिथेच असलेल्या स्थानिकांपर्यंत सर्वजण हेच सांगतायत की डोंगरावर केलेली अनधिकृत बांधकामे, त्यांचे रस्ते, नदीपात्राला अगदी चिकटून बांधलेली हॉटेल्स, नदीपात्राला घातलेली बंधने, प्रवाहमार्ग बदलण्याचे प्रयत्न व त्यासाठी केलेली डोंगरफोड.. आणि हे आजचेच नाही, तर गेली कित्येक वर्षे चाललेले आहे..
आधी मुळात हिमालय हा मातीचा डोंगर! (आठवा.. ४थी-५वी चा भूगोल) हिमालयाच्या जागी फार पूर्वी "टेथीस" नावाचा समुद्र होता.. ज्यावेळी सर्व खंड निर्माण झाले, त्यावेळी भारतीय उपखंडाचा जमिनीचा ’तुकडा’ सरकत येऊन वरच्या चीन-तिबेट भूभागाला धडकला.. व या टेथीसच्या तळाशी असलेला गाळ वर उचलला जाऊन त्यातून आजच्या हिमालयाची निर्मिती झाली. (म्हणूनच, हिमालयात आजही मीठ सापडते.. ज्याला आपण ’सैंधव’ किंवा Rock Salt म्हणतो)
त्यामुळे, हिमालयातील बांधकामांना भक्कम पाया नाही.. सर्व चालले आहे ते या गाळाच्या ’अतिकठीण’ झालेल्या मातीच्याच भरोशावर.
जे "निसर्गहनन" हिमालयात झाले आहे.. तेच त्याहीपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात, कितीतरी पट जास्त.. इथे मुंबईपुण्यात घडले आहे. कारण इथे आणखी जास्त पैसा आहे.. जागेला जास्त भाव आहे.. आणखी जास्त मस्ती व मग्रुरी आहे.. भयानक बेपर्वाई आहे... फक्त फरक असा की, हिमालय मातीचा बनलाय तर आपला सह्याद्री हा खरंच वज्रासारखा कठीण आहे.. कारण तो थंड झालेल्या लाव्हारसाचा बनला आहे...त्यामुळे आपण सुदैवी! आपल्याला फार कमी प्रमाणाचे नुकसान सहन करावे लागते.. अन्यथा आजपर्यंत कदाचित मुंबईची नामोनिशाणीही राहीली नसती. कारण एका बाजूला समुद्र व दुसऱ्या बाजूला (जर) मातीचा सह्याद्री, वर हे अत्याचार गेली कित्येक दशके या आपल्या तथाकथित "प्रगत" शहरांमधे अहोरात्र चालू आहेत. मग आपण दुसरे काय अपेक्षिणार ना?
आणि दुर्दैवाने हीच परिस्थिती देशाच्या इतर भागांमधूनही दिसून येते.
(क्रमशः)
उत्तम आणि सडेतोड विचार आहेत. पुढील भागाची वाट पाहातो.
ReplyDeleteमंगेश नाबर