__________________________________

Wednesday

निसर्ग सांगतोय...पण आपण ऐकणार का? (भाग २)

उत्तराखंडचे कांड चालूच आहे... पुन्हा पाऊस, पुन्हा दरड कोसळणे, मदतकार्यात अडथळे इ. इ.

...जितका मी या घटनेवर विचार करतो, बघतो, ऐकतो तेवढे विविध पैलू डोक्याला मुंग्या आणतात. या एका घटनेने खूप साऱ्या मुद्द्यांना ऐरणीवर आणले आहे.

मला आठवते तसे साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वीपासून मी रोजचे वर्तमानपत्र वाचतोय. न चुकता हवामान, कमाल व किमान तापमान, आर्द्रता बघतो. उपग्रहाने पाठविलेले छायाचित्र, त्यातले ढग इ. जितके समजतील ते पाहतो.. बरीच वर्षे पाऊस अगदी नियमितपणे जूनच्या सुरूवातीला पुण्यात यायचा.. आणि संततधार पडायचा. टिपीकल ’पुणेरी’ पाऊस असे त्याचे वर्णन केले जायचे. साधारण २-३ महिने व ५००-६०० मिमी झाले की जायचा व मस्त थंडी यायची. पावसाळ्याआधी उन्हाळा असायचा, जो कधीही ३५-३६ सेल्सियसच्यावर सरकत नसे. वर बोनस थंडावा म्हणून उन्हाळ्यात गारांचा ’वळिवाचा’ पाऊसही पडे. त्यात इंद्रधनुष्य पाहणे.. कधीतरी एकापेक्षा जास्तपण असत.. ही सुद्धा आता आठवणच राहिली आहे..

Courtesy:Flickr


पण हळूहळू हा निसर्गक्रमसुद्धा ’मूडी’ झालाय. किंवा तो पूर्वीसारखा सौम्य न राहता दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. आताशा, एक ८-१० वर्षांपासून उन्हाळा नियमितपणे कडक असतो. ४०-४१ हे कमाल तापमान बऱ्याच वेळा नोंदविले जाते (जी पूर्वी एक स्वतंत्र बातमी असायची)..मे महिन्यात दुपारच्या वेळी बाहेर पडणे हे तुमच्या जीवाला घातक ठरू शकेल, इतकी तीव्रता त्या उन्हात असू शकते. वळिवाचा पाऊस उन्हाळ्यातून गायबच झालाय.. तो आजकाल उन्हाळ्यात न पडता, उन्हाळ्याच्या अगदी शेवटी येतो व एखादाच असा पाऊस होतो. पावसाळयाची तऱ्हा अजून निराळी. पावसाळा अजूनही येतो तसा वेळेवर. पण तो येतो, पहिले २-४ दिवस धुवांधार पडतो... इतका, की धरणे भरतात, पाणी सोडले जाते, नदीकाठच्या लोकांना धोक्याचा इशारा दिला जातो.. तिकडे गावाकडे शेतकरी खरीपाच्या पेरण्या करतात... अन्‌ मग पाऊस गायब होतो! एकदा त्याने दडी मारली की मग विचारू नका.. त्या केलेल्या पेरण्या करपेपर्यंत तो काही परत येत नाही... जूनच्या शेवटच्या आठवड्यानंतर ते जवळजवळ जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पुन्हा एक ’मिनी उन्हाळा’ येतो.. आणि मग पेरण्या वाया जाणार हे जवळपास नक्की झाले की मग ’तो’ परततो.. ऑगस्टमधे पुन्हा त्याचा धुमाकूळ... यावेळी तो इतका पडतो, की मावळात भाताची खाचरेपण वाहून जातात...पुण्यात खडकवासल्याचे, पानशेतचे सोडलेले पाणी ओंकारेश्वराला बुडवते.. रस्त्यांची खड्डे पडून चाळणी होते. हे सर्व होईपर्यंत त्याची ५००-६०० मिमीची सरासरी पूर्ण होते व तो आपल्याला टाटा करतो... अरे, सरासरी झाली, पण उपयोग काय? पहिल्या पेरण्या वाळून गेल्या व नंतरच्या वाहून गेल्या...२-४ धरणे भरतील एवढे पाणी वाहून गेले...आम्ही जागचे जागीच आहोत..
...तर असा पावसाळा ऑगस्टमधे संपतो.

हिवाळ्याचे तेच! पावसाळा व हिवाळा यांच्यामधे परत एक छोटा उन्हाळा येतो.. पूर्वी तो फक्त ऑक्टोबरपुरता मर्यादित होता, म्हणून त्याला "ऑक्टोबर हीट" म्हणायचे. आता त्याने आगेमागे हातपाय पसरून तो पार सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या सुरूवातीपर्यंत पसरलेला असतो. लहानपणी, मला लख्ख आठवते, दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नानाला पहाटे थंडीने कुडकुडत उठणे हा एक नकोसा प्रकार असायचा. आता दिवाळीत थंडी कुठे असते? थंडी पडते ती नोव्हेंबरच्या शेवटी... तीसुद्धा अगदी उपकार केल्यासारखी... पूर्वी १० सेल्सियच्या खाली नियमितपणे जाणारा पारा, आता १२-१५ लाच थांबतो.. अगदी २०१२ मध्येपण थंडी एक आठवडाभरच चांगली तीव्र होती.. त्यापेक्षा जास्त नाही... आणि रोज सकाळी ९-१० पर्यंत असणारे धुके कधीकधीच दिसते, तेपण ७-८ वाजेपर्यंतच..

हे सगळे वर्णन झाले पुण्याच्या हवामानाचे, पण मला खात्री आहे की असाच फरक सगळीकडेच झाला असणार आहे.

या सगळ्याचा अर्थ काय? तर निसर्ग बदलतो आहे.. असं म्हणतात, की तुम्ही निसर्गाला जे द्याल त्याच्या दसपट, शंभरपट तो तुम्हाला परतफेड करतो.. खरं आहे.. तुम्ही एक बी पेरलं की हजार दाण्यांचं कणीस तुम्हाला मिळतं.. तसंच तुम्ही त्याची काळजी केलीत तर तो तुमची दसपट काळजी घेईल. पण तुम्ही त्याच्यावर अत्याचार करत राहिलात तर तो त्याच प्रमाणात प्रत्युत्तर करेल.. सोडणार नाही.

हे आपल्याला जाणवत नाही, कारण आपण याची फिकीरच करत नाही. जोपर्यंत आपल्या जीवाला याची धग लागत नाही, तोपर्यंत आपण गप्प राहणार.."चलता है" आहेच. पण एक दिवस निसर्गाचा उद्रेक होऊन त्याने तांडव सुरू केले, की मग आपण जागे होतो, पळापळ होते, निष्पाप जीव जातात, काहीजण आयुष्यभराचे जायबंदी होतात.. काही हरवितात, लाखो-करोडोंची हानी होते.. तात्पुरती उपाययोजना केली जाते, आणि मग परत पहिले पाढे पंचावन्न सुरू...

उत्तराखंडचे पाऊसकांड किंवा मुंबईपुण्याच्या तत्सम घटना हा त्यातलाच तर प्रकार नाही? ही जाणीव आपल्याला झाली आहे का? हा प्रश्न निसर्गाने उभा केलाय.. पण उत्तर आपल्याला शोधायचे आहे. त्याने आवाज दिला आहे.. पण तो आपण ऐकण्याची शक्ती आणि इच्छा बाळगून आहोत का?
________
(क्रमशः)

1 comment:

  1. छान लिहिले आहे ....आपण सगळ्यांनीच अंतर्मुख व्हावे असा विषय आहे ....

    ReplyDelete