__________________________________

Sunday

भूल पाडणारा "भुलेश्वर"



पुण्यापासून साधारण ५० किमी अंतरावर "भुलेश्वर" हे शंकराचे जागृत देवस्थान आहे. दोन ऑक्टोबरला सुटीचे निमित्त साधून आम्ही मित्र मंडळी तिथे जाऊन आलो. मी बराच आधीही तिथे गेलो होतो. हा योग मात्र खूप काळाने जुळून आला.
भुलेश्वरची वैशिष्ट्ये दोन: पहिले असे की, हे मंदिर अतिशय पुरातन आहे. स्थानिक लोक सांगतात की मूळ मंदिर सुमारे ८५० वर्षांपूर्वीचे आहे...म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्याही आधीचे. बहुधा यादव किंवा सातवाहनकालीन असावे. मंदिर पाहिल्यावर त्याचे प्रत्यंतर येतेच. आणि दुसरे वैशिष्ट्य असे की इथला देव आपल्या ‘जागृता’वस्थेची जाणीव, भक्तांचे प्रसादाचे पेढे खाऊन, करून देतो. हा भाग थोडा श्रद्धा आणि विश्वासाचा आहे.





हे मंदिर एका उंचशा टेकडीवर बांधलेले आहे. मूळ बांधकाम एका किल्ल्याचे आहे. हा किल्ला "मंगळगड" या नावाने ओळखला जाई. त्याचे फुटके बुरुज आणि इतर काही अवशेष अजून शिल्लक आहेत. गडाच्या मध्यभागी मंदिर आहे. गाडी चालवायला अतिशय कठीण अशा घाटातून आपण तिथे पोचतो. वर जात असतानाच आपल्याला मंदिर दिसत असते आणि त्याच्या सौंदर्याची कल्पना येते.

मंदिराची अप्रतिम कलाकुसर आणि त्यावर मोगल राजवटीत झालेले अत्याचार ह्या गोष्टी तिथून आल्यावरदेखील विसरता येत नाहीत. हे ठिकाण मात्र एकदातरी अवश्य भेट देण्याजोगे आहे.

जाण्यासाठी पुणे-सोलापूर हायवेवरून (NH-6) सोलापूरकडे जाताना साधारण ४०-४२ किमीवर उजव्या हाताला भुलेश्वर फाटा आहे. इथून आत वळल्यावर १२ किमी रस्ता आहे. हा रस्ता मध्यम अवस्थेत आहे.

तसेच पुणे-नीरा मार्गावर सासवड लागते. सासवड बस स्टँडच्या पुढे लगेच माळशिरस-बेलसर-भुलेश्वर फाटा आहे. इथून साधारण २२-२५ किमी अंतर कापावे लागते. हा रस्ताही मध्यमच आहे.

दोन्ही मार्ग व खुद्‍द भुलेश्वर हे गर्दीपासून लांब आहेत. जेवण व निवास याची सोय भुलेश्वरला नाही. त्यासाठी सासवड किंवा यवत येथे यावे लागते. पुण्याहून १ दिवसात जाऊन परतता येते. सप्टेंबर ते फेब्रुवारी हा काळ प्रवासास उत्तम आहे.


--प्रायोजक--
The Money Tree
----------

1 comment:

  1. आपला हा लेख आवडला. पुण्याहून केवळ ५० किलोमीटर्स अंतरावर असलेले हे भुलेश्वर ठाऊक नव्हते. आपल्या या लेखाची माहिती माझ्या इतर मित्रांना देत आहे.
    मंगेश नाबर

    ReplyDelete