__________________________________

Thursday

....महाराष्ट्र निवडणूक प्रा. लि. (उर्वरीत भाग)

(दुसर्‍या दिवशी...सायब्या येतो...आता भाऊंना सगळे समजले असल्याने, हा निवांत...)
"नमस्कार भाऊ....येऊ का??"

"ये रे...आज काय बातमी?"

"कसली बातमी भाऊ....तुमी बोला, काई ईचार झाला का?"

(भाऊ मिस्किलपणे....)
"कसला ईचार?" (..त्यांच्या डोक्यात पक्का प्लॅन आहे)

"आवो भाऊ...असं काय करता राव...काल समदं म्हाभारत सांगितलं न्हाई का?"

"मंग, तू काय न्हाई का ईचार केला? का आपलं वझं टाकलं भाऊकडं आन्‌ आपन मोकळे....काय? खरं का नाय?"

"आवो भाऊ...असं का बोलाय लागले तुमी... आता काल तुमीच तर म्हनला की त्वांड काळं कर हितनं म्हनून..."

"आरं त्वांड काळं कर म्हनलं, मंजे डोस्कं गहाण टाक आन्‌ कसला विचारबी करू नगं असा अर्थ व्हतो का??"

"आवो भाऊ, येवडी आक्कल आसती...तर...." (थांबतो..), "...आनी काय पायजे व्हतं तवा...मंग कालच्यालाच कायतरी जुगाड नस्तं का केलं म्या..."

(भाऊ हसतात...)
"ते बी खरंच म्हना..."

(भाऊ हसतात तसे सायब्या ओळखतो की काम फत्ते झालं आहे....तोही थोडा हसतो, अजिजीने)
"ओ भाऊ....आता सांगा की राव, काय तुमी पन आमची मस्करी कराय लागले आता..."

"सायब्या...आता सांगतो ते करा..."

"हा भाऊ, तुमी बोला फकस्त....काम झालं म्हनून समजा..."

"आपण काय बॅनर, पोस्टर लावली हायेत का?"

"छापून तयार हायेत भाऊ....आज राती सगळी डकवायचीत..."

"सगळीच्या सगळी...नीट ऐक, सगळीच्या सगळी, नास करून टाका...कायबी शिल्लक ठीवू नका..."

(सायब्या उडतो...)
"काय???? भाऊ हे काय सांगताय? आवो आपन निवडनुकीचं बोलतोय राव....तुमी तर बॉडीचं सांगताय.."
(बॉडी - एखाद्याला उचलून गायब करणे इ कामात वापरला जाणारा भाऊंचा नेहमीचा शब्द)

(भाऊ डोळे वटारतात...)

"ए मुडद्या, त्वांड बंद ठेव आन्‌ मी काय सांगतोय ऐक... मी आता निवृत्तीची घोषणा करणार हाये...त्याची तयारी करा...."

(सायब्या आता फक्त रडायचा बाकी आहे.....तो भाऊंना खोटा धीर द्यायचा प्रयत्न करतो.)

"आवो भाऊ...आसं नगा करू, इतकं मनाला कशापायी लावून घेताय? तुमी आसं केलं तर आमी कुनाकडं बघायचं?? आमी कुटं जायाचं??? आता आमचं कसं व्हनार??"

"ए भXXX, रडतो कशाला रे....मी हाये जिता अजून हितं.."

"मंग काय करायचं? तुमी तर बॉम टाकला आमच्यावर...."

"गप ऐक....नवीन पोस्टर छापा..."

"कसली??"

"आपल्या थोरल्या दादांच्या नावाची...." (भाऊंचे चिरंजीव..), "...आपन यंदा त्याना उभं करू...समद्या कार्यकर्त्यांना सांगा...नको, हितं बंगल्यात मिटींग करा, म्याच सांगीन....त्यांच्या नावावर कायबी रेकॉर्ड न्हाई...लोकांना सांगू की आपन नवीन आन्‌ तरून रक्ताला संधी देत आहोत...त्यांचा जनसंपर्क मोठा नाई....तवा यंदा दुप्पट प्रचार करा...पायजेल तर बॉलीवूड्मदून हिरोईनी बोलवा...काय वाटेल ते करा...लोकं जमा झाली पायजेत....समजलं का? आनी या सगळ्या कामाला तुमचं पोरगं लावा, त्यालाबी यिवू दे रिंगनात....."

(सायब्याला सगळं लक्षात येते...त्याचा चेहरा उजळतो...आवाजात उत्साह)
"आयला....हे ध्यानातच न्हाई आलं माज्या.....एक नंबर आयडीया हाये भाऊ...बास. पन येकच अडचन हाये, बोलू का?"

"आता काय??"

"त्या वस्तीवाल्या नेत्याचं काय करायचं? बॉडी करू का त्याची??"

"अरे अकलेच्या कांद्या, खूळ लागलं का रं तुला? मला बर्बाद करायचं ठरिवलं का तू?"

"आवो पन, त्याचं करायच काय?"

"त्याला जाऊन सांगा, हा मतदारसंघ काय तुझ्या बापाची जागीर न्हाई म्हनावं...."

(उरलेले वाक्य सायब्या स्वतःच म्हणतो)
"....आमच्या दादांच्या बापाची हाये!!!"

(भाऊ आणि सायब्या मोठ्याने हसतात व एकमेकांना टाळ्या देतात.)

(...आणि अशा रीतीने भाऊंचा आणि सायब्याचासुद्‍धा कारभार चालू राहतो)
(समाप्त)

☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺
Sponsored by : The Money Tree
☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻

No comments:

Post a Comment