__________________________________

Sunday

मैत्रीदिनाच्या निमित्ताने...

आज "World Friendship Day"...आपल्या भाषेत, ’मैत्रीदिन’. पाश्चिमात्य लोकांचे एक चांगले असते, ते कुठल्याही गोष्टीचे ’साजरीकरण’ करतात. (celebration ला आणखी चांगला शब्द आहे का?) आपल्याकडेही या गोष्टी आजकाल लगेच उचलल्या जातात. आता ही उचलेगिरी चांगली का वाईट वगैरे चर्चा आपण नको करायला. त्यासाठी ’तज्ञ’ नावाची एक विशेष वल्ली असते. इच्छुकांनी कुठलेही न्यूज चॅनेल लावून पहावे. असो..
आपण, त्यातल्यात्यात शहराकडची माणसे, या सर्व गोष्टींचा एक भाग बनून जातो, कळत अथवा नकळत...
आज सकाळपासून माझ्या मोबाईलला सवड नाही. दर १०-१५ मिनिटांनी माझ्या कुठल्यातरी ’फ्रेंडाला’ माझी आठवण होते आणि माझ्या Inbox मध्ये ती जमा होते आहे...चांगले आहे. आपण इतरांच्या स्मरणात आहोत, दखलपात्र आहोत, आपल्यासाठी लोक मेसेज Forward तरी करतात, त्यांच्या Distribution lists मध्ये आपण आहोत, इ. इ. गोष्टी सुखावणार्‍या तर नक्कीच आहेत, नाही का?
मीपण आज ठरवले की बुवा आजचा दिवस आजच्या कारणासाठी वापरावा. संध्याकाळी थोडा वेळ काढून ३-४ मित्रांचे नंबर शोधले. हे सगळे असे आहेत की गेले कित्येक महीने त्यांच्याशी बोललो नव्हतो. मात्र, मध्यंतरी मी माझा मोबाईल बदलला, त्याआधी MSP पण बदलला होता, पण या सर्व transitions मध्ये या मित्रांचे नंबर import करायला विसरलो नव्हतो. (आताशा खरी मैत्री मोबाईल मध्ये carry forward झाली तरच खरी मानतात...)
तर, या मित्रांना फोन केले. बोललो थोडेफार...सुरूवातीला सगळेच formal formal झाले. पण नेटाने संभाषण रेटल्यावर मात्र खरी मजा आली. अक्षरशः काय बोलू आणि काय नको असे झाले होते. न चुकता प्रत्येकाने, "यार, एकदा जमूत यार..." या वाक्य उच्चारलेच.
आता १५ ऑगस्टचा प्लॅन बनतो आहे...पाहूत काय होते ते. मैत्रीदिनाचा एवढा उपयोग झाला तर आणखी काय हवे??

Friday

सामान्य जनतेचा कारखाना....

नुकतीच एक बातमी वाचली, तुम्हीही वाचली/ऐकली असेल.. गरवारे नॉयलॉन्स कंपनीबद्दल...

ही कंपनी सुमारे बारा वर्षांपासून बंद पडलेली आहे. management चे प्रश्न आणि ते सोडवण्याची अनासक्ती या दोन प्रमुख कारणांमुळे कंपनीचे अगदी थोडक्यात सांगायचे तर दिवाळे निघाले. जवळजवळ बाराशे कामगार आणि त्यांची कुटुंबे या कारखान्यावर अवलंबून होती. कंपनी बंद पडणार हे लक्षात येताच सगळ्यांचे धाबे दणाणले. "आता पुढे काय?" असा जीवनमरणाचा प्रश्न आऽऽ वासून त्यांच्या समोर उभा राहिला.

जे सर्वसामान्यपणे शहाणे होते, ते आधीच निघाले होते...जे थोडे उशीरा जागे झाले, त्यांनी भराभर निर्णय घेत पुढची व्यवस्था केली.... आणि मार्गस्थ झाले....राहता राहिले दोनशे दहा. यांना आपण काय म्हणायचे? शहाणे की वेडे?

बहुतेक प्रश्नांची उत्तरे कालौघात मिळतात असे म्हणतात.. फक्त वाट पाहण्याची तयारी पाहिजे. पण इथे त्याचीही गरज नव्हती. समोरचा अंधार स्पष्ट दिसत होता. तिकडे वाट चालणारे हे निव्वळ वेडे ठरणार होते.

पण काही लोकांना वेडेपणा करायला आवडतो.....

या दोनशे दहा जणांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला...निर्णय असा झाला, की धीर सोडायचा नाही आणि अखेरपर्यंत प्रयत्‍न करायचे. त्यासाठी त्यांनी ‘सामान्य जनतेची आघाडी’ स्थापन केली.

कंपनीचा लिलाव होणार असल्याचे कळले....

लोक पुन्हा जमले....अक्षरशः उधा‌रउसनवार करून त्यांनी पैसा जमवला. लिलावात भाग घेतला. लिलाव झाला...किंमत ठरली ६.०१ कोटी रूपये....पैसे भरण्याची मुदत आणि हप्ते ठरवून मिळाले...लोकांनी अजून जोर लावला.... आणखी पैसे जमविले....

दिनांक ४ नोव्हेंबर २००८ ला ‘सामान्य जनतेच्या आघाडी’ने शेवटचा हप्ता, ९४ लाखांचा, जमा करून कंपनीचा ताबा मिळवला....कारखान्याचे नवीन नाव ठरले, "सामान्य जनतेचा कारखाना". एकजुटीचा विजय झाला...१२ वर्षांचे तप फळले....

बहुतेक प्रश्नांची उत्तरे कालौघात मिळतात असे म्हणतात.. फक्त वाट पाहण्याची तयारी पाहिजे....

.....खरे आहे!