__________________________________

Showing posts with label traffic police. Show all posts
Showing posts with label traffic police. Show all posts

Saturday

नियमांची ऐशीतैशी..... भाग १

काळ - सध्याचा.. 
वेळ - सकाळ, दुपार अशी केव्हाची तरी...
स्थळ - तुमचे/आमचे गाव किंवा शहर (जिथे ट्रॅफिक पोलीस असतात असे कोणतेही).. त्यातला एखादा सिग्नल चालू असलेला चौक...
(हे सर्व एकत्र मिळणे अत्यंत अवघड आहे हे मला माहित आहे, पण आतापुरते असे आपण गृहित धरूत...)
प्रसंग - सिग्नल हिरव्याचा लाल होतो, आणि तितक्यात... एक गाडी वेगाने सिग्नल क्रॉस करते...



"फुर्रर्रर्रर्र…. " (चौकातल्या एका झाडामागून आवाज येतो....गाडी थांबते... झाडामागून एक पोलीस अवतीर्ण होतो...)
पोलीस - "साहेब, लायसन दाखवा … "
गाडीवाला माणूस - "काय झाले?"
पो - "लायसन दाखवा …"
गा. मा. - "अरे पण झालं काय?"
पो - "सिग्नल तोडला तुमी …"
गा. मा. - "नाही, मी यलो असतानाच पुढे आलो… " (चेहऱ्यावर भोळेपणाचा आव आणलेला...)
पो - "नाय.. रेड झालाता .. मी पायलंय.."
गा. मा. - "अहो नाही साहेब.."
पो - " तुमी एकलेच पुडं कसे आला मंग? बाकीचे थामलेत बराबर.. "
गा. मा. - (बॅकफूटवर) "ते मागे होते..."
पो - (समोरचा नरमलाय हे लगेच ओळखून) "नाय.. तुमी सिग्नल तोडलात... लायसन दाखवा आदी..."
गामा - "पण तुम्ही चौकात का नाही थांबलात आधीच? "
पो - (प्रश्न टाळत...चढ्या आवाजात) "ते कुटं थांबायचं ते आमचं आमी बगू... लायसन दाखवा..." 
(गा. मा. पाकीटातून लायसन्स काढून देतो... )
...
पो - (ते पहात..) "फोटो बराबर नाही.... पी यु सी??? "

गा. मा. - "आहे आहे.. " (शोधाशोध करतो..)
पो - (पुढचा बॉल) "गाडीचे पेपर पन... "
गा. मा. - "देतो.." (शोधाशोध चालू...)
...
पो - (मलिंगा यॉर्कर...) "साहेब, गाडीला फिलम नाय चालत.."
गा. मा. - (अजून पीयुसीच शोधतोय... थांबून..) "व्हॉट? का?"
पो - "कोर्टाची आर्डर हाये..." (पॉ़झ घेऊन) "दोन साल झाले त्याला..."
गामा - (शरणागती...) "आता काय करायचं मग?"
पो - "पावती करायची.." (चेहऱ्यावर किंचित मिश्किल हसू..)
गामा - (हा पण तयारीचा आहे) "साहेब, कशाला पावती करताय.. राहूद्यात... बघा.. करा काहीतरी.."
...
..
(अजून थोडे संवाद होतात)
..
...



पो - "असं कसं सायेब.. तुमी सिग्नल तोडलात.. तुमचं लायसन बराबर नाही..पीयुसी नाही... पेपर नाही.. फिलम काढलेल्या नाहीत.. ३,००० ची पावती होते सायेब..."
गामा - "पण पावती नको ना मला... हे घ्या.. ठेवा...सेटल करा" (१०० ची नोट)
पो - "एवड्यात नाय सेटल होत.."
गामा - "माझ्याकडे जास्ती नाहीयेत हो...बर हे अजून घ्या" (आणखी एक नोट काढतो)
पो - "चला.. जाऊद्यात.."
(गाडी पुढे जाते.. पोलीस झाडामागे जातो...)

तुमच्या आमच्या आयुष्यात नक्की घडून गेलेला हा एक प्रसंग... आता किती नियम यात मोडले गेले बघा...  



१. गाडीने सिग्नल पिवळा असताना वेग कमी करायला हवा.
२. ट्रॅफिक पोलीसाने चौकात थांबून रहदारीचे नियमन करायला हवे.. (सिग्नल चालू असले तरीही)
३. आपले लायसन्स व्यवस्थित अवस्थेत हवे.
४. गाडीचे पीयुसी सदैव सोबत हवे
५. गाडीची कागदपत्रे (स्वाक्षांकित - self attested) सोबत हवीत
६. गाडीला फिल्म्स नसाव्यात 
७. लाच देऊ नये आणि घेऊ नये... (हो... असा नियम आहे... तो मोडल्यास दखलपात्र गुन्हा होऊ शकतो)
८. पावतीचा आग्रह धरावा (कारण ते पैसे सरकारी खजिन्यात जातात.. ज्याचा काहीतरी उपयोग होण्याची शक्यता असते)