अखेर तो दिवस आला होता ...
गेले सहा महिने त्याला उसंत नव्हती.. तो कानात वारा भरल्यासारखा फिरत होता... त्याला कशाचेच भान नव्हते.. कुठे जातोय.. काय खातोय.. कुठे झोपतोय.. या असल्या सामान्य गोष्टींची फिकिर त्याला नव्हती.. त्याला आपले कपडे मळलेत का.. आपली तब्येत कुरकूरती आहे का... चप्पल तुटली आहे का... याच्याशी देणेघेणे नव्हते.. तो जणूकाही या सगळ्यांपासून अलिप्त होता.. कोणत्यातरी अदृश्य कवचकुंडलांनी त्याला जणू संरक्षित केले होते...
गल्लीच्या कोपऱ्यावरच्या उनाड टोळक्यापासून ते प्रत्यक्ष दिल्लीत उंची हॉटेलमधे नावाजलेल्या उद्योजकापर्यंत आणि साध्या बचत गटाच्या ’ताईं’पासून ते हजारो लोकांच्या जणू आई असलेल्या ’माईं’पर्यंत... सर्व स्तरांतल्या लोकांना तो भेटला होता.. किती माणसे.. किती व्यक्ती.. किती तऱ्हा..
अंतिम उद्देश त्याच्यासाठी एकच होता.. पण तो साध्य करण्यासाठी प्रत्येकाशी बोलण्याची गोष्ट वेगळी होती.. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे होते व त्यांचे समाधान करणारी उत्तरेही... आणि त्याच्यासाठी एक चूकही होणे अमान्य होते... त्याचे त्यालाच.. स्वतःच्या मनानेच त्याने हे ठरविले होते..
त्याच्या अंगाखांद्यावर धूळ, धूर, माती व घाम यांचा एक संमिश्र थर जमला होता.. त्याचे केस भुरकटले होते.. त्याचा श्वास सदैव फुललेला होता...
एखादा कसलेला सैनिक जसा युद्धभूमीवर वीरश्रीने संचार करतो.. तसाच हाही.. फक्त याची युद्धभूमी निराळी होती.. डावपेच वेगळे होते... शत्रू वेगळे होते आणि सर्वत्र होते... खुद्द त्याच्या गटातही...
अंतिम उद्देश एकच होता.. सैनिकाला विजय हवा असतो.. यालाही हवा होता...
गेले सहा महिने तो त्याच्या युद्धभूमीवर सदैव लढत होता.. नवनवीन डावपेच लढवत होता.. पायाला भिंगरी लावल्यासारखा सतत फिरत होता...थकत होता.. धडपडत होता.. परत नव्या उत्साहाने उभा राहत होता... आणखी उमेदीने आणखी जास्त लढत होता...
गेल्या आठवड्यात युद्ध जवळ जवळ संपले होते... आता विजय त्याला निश्चितपणे दिसत होता... केवळ काही दिवसांचीच बात होती..
..अखेर तो दिवस ’उद्या’वर आला होता....
खरेतर त्याला आता लढण्याची गरज नव्हती... पण आजही त्याला अजिबात वेळ नव्हता.. आता तो विजय साजरा करण्याच्या तयारीला लागला होता.. सतत कोणाला सूचना.. कोणाला विनंती.. कुणाचा फोन..असे चालले होते... त्याच्या आजूबाजूला माणसांचा नुसता फुफाटा झाला होता...
... असा हा दिवसही संपला.. आता उरले फक्त काही तास...
खूप दिवसांनी तो आज जरा शांत झोपला.. पण झोप कुठली येतीय?... मनात उत्साह इतका की त्याला धड झोपही येईना.. रात्रभर त्याने नुसती कूस बदलून वेळ काढला... आणि सकाळी उठल्यावर पुन्हा एकदा दंगा सुरू झाला..
अखेरीस तो दिवस उजाडला होता ...घटिका गेल्या.. आता काही पळे उरली..
.. सकाळपासून त्याचा फोन खणखणत होता... अनेक लोक सतत त्याच्याशी संपर्क ठेवून होते.. त्याच्या भागातून, आजूबाजूच्या क्षेत्रातून... राज्यातून.. देशभरातून कोणाची परिस्थिती काय आहे.. हे समजत होते..
... त्याला हवा असलेला विजय दिसू लागला होता.. उत्साह वाढत होता.. आनंद ओसंडू लागला होता..
शेवटी दुपारनंतर त्याला त्याचा विजय झाल्याचे अधिकृतपणे समजले... कधी नव्हे तो त्याला त्याच्या ’अण्णां’चा फोन आला...
"..भैयाजी, मोजणी झाली... ६८००० च्या लीडनं आपण जिंकलो... तुम्ही लय कष्ट घेतले... त्याचं फळ आहे हे.. हा माझा नाही.. तुमचा... तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा विजय आहे.. सगळीकडे जवळपास अशीच परिस्थिती आहे.. यंदा आपलेच सरकार येणार........"
हे ऐकून त्याच्या मनात जो काही आनंद उसळला..ते त्याचे त्यालाच ठाउक.. त्याने फोन बंद केला.. खिशात ठेवला.. आणि शेजारी असलेल्या पुडक्यातून मूठभर गुलाल घेऊन आकाशात उधळला...
"ये...हे................"
...आणि तो समोर नाचणाऱ्या त्याच्यासारख्याच अनेक सैनिकांच्यात मिसळून दिसेनासा झाला....
कारण, तोही एक त्यांच्यासारखाच सामान्य कार्यकर्ता होता...