__________________________________

Showing posts with label people. Show all posts
Showing posts with label people. Show all posts

Sunday

भूल पाडणारा "भुलेश्वर"



पुण्यापासून साधारण ५० किमी अंतरावर "भुलेश्वर" हे शंकराचे जागृत देवस्थान आहे. दोन ऑक्टोबरला सुटीचे निमित्त साधून आम्ही मित्र मंडळी तिथे जाऊन आलो. मी बराच आधीही तिथे गेलो होतो. हा योग मात्र खूप काळाने जुळून आला.
भुलेश्वरची वैशिष्ट्ये दोन: पहिले असे की, हे मंदिर अतिशय पुरातन आहे. स्थानिक लोक सांगतात की मूळ मंदिर सुमारे ८५० वर्षांपूर्वीचे आहे...म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्याही आधीचे. बहुधा यादव किंवा सातवाहनकालीन असावे. मंदिर पाहिल्यावर त्याचे प्रत्यंतर येतेच. आणि दुसरे वैशिष्ट्य असे की इथला देव आपल्या ‘जागृता’वस्थेची जाणीव, भक्तांचे प्रसादाचे पेढे खाऊन, करून देतो. हा भाग थोडा श्रद्धा आणि विश्वासाचा आहे.





हे मंदिर एका उंचशा टेकडीवर बांधलेले आहे. मूळ बांधकाम एका किल्ल्याचे आहे. हा किल्ला "मंगळगड" या नावाने ओळखला जाई. त्याचे फुटके बुरुज आणि इतर काही अवशेष अजून शिल्लक आहेत. गडाच्या मध्यभागी मंदिर आहे. गाडी चालवायला अतिशय कठीण अशा घाटातून आपण तिथे पोचतो. वर जात असतानाच आपल्याला मंदिर दिसत असते आणि त्याच्या सौंदर्याची कल्पना येते.

मंदिराची अप्रतिम कलाकुसर आणि त्यावर मोगल राजवटीत झालेले अत्याचार ह्या गोष्टी तिथून आल्यावरदेखील विसरता येत नाहीत. हे ठिकाण मात्र एकदातरी अवश्य भेट देण्याजोगे आहे.

जाण्यासाठी पुणे-सोलापूर हायवेवरून (NH-6) सोलापूरकडे जाताना साधारण ४०-४२ किमीवर उजव्या हाताला भुलेश्वर फाटा आहे. इथून आत वळल्यावर १२ किमी रस्ता आहे. हा रस्ता मध्यम अवस्थेत आहे.

तसेच पुणे-नीरा मार्गावर सासवड लागते. सासवड बस स्टँडच्या पुढे लगेच माळशिरस-बेलसर-भुलेश्वर फाटा आहे. इथून साधारण २२-२५ किमी अंतर कापावे लागते. हा रस्ताही मध्यमच आहे.

दोन्ही मार्ग व खुद्‍द भुलेश्वर हे गर्दीपासून लांब आहेत. जेवण व निवास याची सोय भुलेश्वरला नाही. त्यासाठी सासवड किंवा यवत येथे यावे लागते. पुण्याहून १ दिवसात जाऊन परतता येते. सप्टेंबर ते फेब्रुवारी हा काळ प्रवासास उत्तम आहे.


--प्रायोजक--
The Money Tree
----------

मैत्रीदिनाच्या निमित्ताने...

आज "World Friendship Day"...आपल्या भाषेत, ’मैत्रीदिन’. पाश्चिमात्य लोकांचे एक चांगले असते, ते कुठल्याही गोष्टीचे ’साजरीकरण’ करतात. (celebration ला आणखी चांगला शब्द आहे का?) आपल्याकडेही या गोष्टी आजकाल लगेच उचलल्या जातात. आता ही उचलेगिरी चांगली का वाईट वगैरे चर्चा आपण नको करायला. त्यासाठी ’तज्ञ’ नावाची एक विशेष वल्ली असते. इच्छुकांनी कुठलेही न्यूज चॅनेल लावून पहावे. असो..
आपण, त्यातल्यात्यात शहराकडची माणसे, या सर्व गोष्टींचा एक भाग बनून जातो, कळत अथवा नकळत...
आज सकाळपासून माझ्या मोबाईलला सवड नाही. दर १०-१५ मिनिटांनी माझ्या कुठल्यातरी ’फ्रेंडाला’ माझी आठवण होते आणि माझ्या Inbox मध्ये ती जमा होते आहे...चांगले आहे. आपण इतरांच्या स्मरणात आहोत, दखलपात्र आहोत, आपल्यासाठी लोक मेसेज Forward तरी करतात, त्यांच्या Distribution lists मध्ये आपण आहोत, इ. इ. गोष्टी सुखावणार्‍या तर नक्कीच आहेत, नाही का?
मीपण आज ठरवले की बुवा आजचा दिवस आजच्या कारणासाठी वापरावा. संध्याकाळी थोडा वेळ काढून ३-४ मित्रांचे नंबर शोधले. हे सगळे असे आहेत की गेले कित्येक महीने त्यांच्याशी बोललो नव्हतो. मात्र, मध्यंतरी मी माझा मोबाईल बदलला, त्याआधी MSP पण बदलला होता, पण या सर्व transitions मध्ये या मित्रांचे नंबर import करायला विसरलो नव्हतो. (आताशा खरी मैत्री मोबाईल मध्ये carry forward झाली तरच खरी मानतात...)
तर, या मित्रांना फोन केले. बोललो थोडेफार...सुरूवातीला सगळेच formal formal झाले. पण नेटाने संभाषण रेटल्यावर मात्र खरी मजा आली. अक्षरशः काय बोलू आणि काय नको असे झाले होते. न चुकता प्रत्येकाने, "यार, एकदा जमूत यार..." या वाक्य उच्चारलेच.
आता १५ ऑगस्टचा प्लॅन बनतो आहे...पाहूत काय होते ते. मैत्रीदिनाचा एवढा उपयोग झाला तर आणखी काय हवे??

Friday

दिवाळीचे Aftermaths - भाग १

आली आली म्हणेपर्यंत दिवाळी संपलीसुध्दा! कसे दिवस सरतात काही कळत नाही...( Actually, मी पहिल्यांदा ’कसे दिवस जातात’ असे लिहिणार होतो, पण त्याचा दुसराही एक अर्थ होतो म्हणून रद्द केले...शीः, वात्रटच आहे मेला! असो.)



तर मी म्हणत होतो की दिवाळी आली‍, लोकांनी भरपूर Enjoy केले. काही रजा घेऊन गावी जाऊन आले (काही अजून यायचेत, ते आले की रस्ते परत भरतील), काही १-२ दिवसांच्या outing ला गेले, काहींनी tourist package घेतले वगैरे...


काहीजण मात्र इथेच थांबले...या वाक्यातल्या "इथेच" च्या जागी तुमच्या गावाचे नाव टाका, काही फरक पडत नाही. मुद्दा हा की या ‘काहीं’नी काय केले? वर वर्णन केलेल्या लोकांनी enjoy केले, यांनी नाही केले? ... याचे उत्तर ‘केले ना...’ असे आहे...म्हणजे काय काय केले, असे विचारले तर "निवांत विश्रांती घेतली", "भरपूर खरेदी केली", "खाल्लो, प्यालो, मजा केली", (note the underline) "खूप फटाके उडवले..." इ. उत्तरे मिळतील..अर्थातच, ही यादी खूप मोठी आहे, पण ही झाली प्रातिनिधीक उदाहरणे.


यातला शेवटचा प्रकार (फटाके) हा जरा त्रासदायक आहे...दोन कारणांसाठी; एक म्हणजे आमची कॉलनी बरीच दाटीवाटीची असल्याने घरात फटाके फुटताहेत असे मला सदैव वाटत होते. तरी आमच्या घरी लहान मूल, आजारी माणूस, ज्येष्ठ नागरीक असे कोणीही नाहीत. पण आवाजाचा त्रास इतका की धडधाकट माणसे पण आजारी पडावीत. हा एक Personal भाग झाला, आणि दुसरे म्हणजे बेदम कचरा...आज पहावे तिथे कागदाच्या कपट्यांचे ढीगच्या ढीग जमा झाले आहेत. जणू काही जगातला सगळा कागद आपल्या इथे आलाय असे वाटू लागते. भयंकर प्रमाणावर कागद पाहिला की मला तितकेच वाईट वाटते. कारण, कागदाचा थेट संबंध लाकडाशी, पर्यायाने झाडांशी येतो. ज्या प्रमाणात वाया गेलेला हा कागद, त्याच प्रमाणात (किंबहुना जास्त प्रमाणात) केली गेलेली, आणि अर्थातच वाया गेलेली वृक्षतोड असे समीकरण आहे...त्याचा जास्त त्रास होतो.


आपल्या लोकांची मनोवृत्ती काही कळत नाही, फटाके उडवा म्हणले तर एकाला दहा तयार होतात...पण वृक्षारोपण करायला मात्र शाळेतल्या मुलांना वेठीला धरावे लागते....तेही विद्यार्थी, शिक्षक यांच्या अनिच्छेनेच. चांगल्या गोष्टी जबरदस्तीने लादाव्या लागतात हे खरेच एक कोडे आहे. समाजाच्या जडणघडणीत काही basic problem आहे का काय? काही कळत नाही....


...खरंच काही कळत नाही.