__________________________________

Friday

निसर्ग सांगतोय...पण आपण ऐकणार का? (भाग ३)




...उत्तराखंड पाऊसकांडाने आणखी काही गोष्टी अधोरेखित केल्या.

एक म्हणजे, भारतीय लष्कर, त्यांचे जवान, त्यांची साधनसामग्री, त्यांची काम करण्याची पद्धत किंवा एकूणच विचार करण्याची पद्धत ही कौतुक करावी तितकी कमी आहे. भारताची ही एक संस्था अशी आहे, की जिचा भरोसा केला जाऊ शकतो, मग प्रसंग कसलाही असो.. लष्कर आहे म्हटले की चिंता नाही. केवळ १०-१२ दिवसांत या लोकांनी ६०,००० ते ७०,००० यात्रेकरूंची सुटका केली. आणि तीसुद्धा प्रतिकूल हवामानात.. केवढे व्यवस्थापन, केवढी संघशक्ती, केवढी ऊर्जा.. वा!

Courtesy:IAF Handout


दुसरे म्हणजे, "सरकारी" हा शब्द आता अधिकृतरित्या ’शिवी’ म्हणून वापरायला हरकत नाही... जे जे काही सरकारी म्हणून या आपत्तीत किंवा आपत्तीनिवारणात होते, ते सर्व अत्यंत खराब दर्जाचे, कमालीच्या असंवेदनशीलतेचे किंवा निव्वळ दिङ्मूढ अवस्थेचे होते. म्हणजे, सुरूवातीला जेव्हा लष्कर आले नव्हते त्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसांत, प्रशासन नावाची चीज त्या प्रलयातच वाहून गेल्यासारखी नष्ट झाली होती.. जिकडेतिकडे नुसता गोंधळ... कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही! कोण कुठे आहे, किती अडकलेत, किती जिवंत आहेत.. त्यांच्या सुटकेसाठी प्राथमिक प्रयत्न काय करायला हवेत, त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था काय इ. इ. असंख्य प्रश्न नुसते थैमान घालत होते आणि एकाचेही उत्तर प्रशासनाकडे नव्हते... वास्तविक, तिथले स्थानिक प्रशासक हे त्या परिसराचे सर्वाधिक जाणकार.. त्यांना माहिती हवे की अशा आपत्तीत काय करावे, कुठे जावे वगैरे. परंतु, ते लोकच इतके सैरभैर झाले की, त्यांनाच आधाराची गरज होती... मी म्हणतो, चला जाऊ द्यात... सुरूवातीच्या शॉकमध्ये होतेही असे.. पण नंतर??? एकदा लष्कर आले म्हणले की आपण किमान supporting role मध्ये तरी रहावे... ते नाही... अगदी आजसुद्धा, जे दुर्दैवी जीव तिथे प्राणास मुकले, त्यांच्या सडलेल्या प्रेतांमुळे रोगराई पसरू नये, म्हणून लष्करालाच प्रयत्न करावे लागत आहेत.. अगदी निर्जंतुकीकरणाच्या पावडरपासून ते मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांपर्यंत... ही सरकारी अनास्थेची कमाल आहे.

नवीनच एक गोष्ट समजली ती म्हणजे, आपल्याकडे सर्व राज्यांचे आणि केंद्रातसुद्धा "आपत्कालीन व्यवस्थापन" या नावाने एक स्वतंत्र मंत्रालय (खाते) आहे... वा!!! मला प्रश्न पडलाय की, हे मंत्री, त्यांच्या हाताखालचे सगळे संत्री, अधिकारी, कारकून, शिपाई इ. मंडळी यांचे नक्की काम काय? म्हणजे कागदावर तरी या लोकांची Duty काय लिहिली आहे? आपत्ती येऊ नये म्हणून प्रयत्न करणे का आपत्ती आल्यावर कमीत कमी वेळेत मदत यंत्रणा उभी करणे? का कमीतकमी जीवितहानी व वित्तहानी होईल याची काळजी घेणे??? मग पुढचा प्रश्न येतो, यातील नक्की कोणती गोष्ट हे लोक करतात? प्रत्येक राज्यात शे-दोनशे कोटी खर्च करून चालवलेली ही आस्थापना नक्की काम काय करते? आणि कसे? का हे नुसतेच "खातेपिते" खाते असते???

(दोनशे कोटी = २००,००,००,०००.०० चेष्टा आहे का?...अर्थात, हे प्रश्न कमीअधिक प्रमाणात प्रत्येक मंत्रालयालाच लागू होतात. पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे)

आणखी एक ठळकपणे दिसलेली गोष्ट म्हणजे, तीर्थक्षेत्राच्या आणि पर्यटनाच्या ठिकाणी असलेल्या तसेच एकूणच जनतेची ढासळलेली नीतीमूल्ये. पिढ्यानपिढ्या आपण असे शिकत आलो की अडीअडचणीत असलेल्याची नेहमी मदत करावी... आपल्याकडे आलेला पाहुणा हा देवासमान असतो... कोणत्याही व्यवसायाचा मुख्य आधार म्हणजे त्याचा ग्राहक... इ. परंतु, या आपत्तीमध्ये दिसलेली स्थानिकांची लुटारूवृत्ती, दुसऱ्याच्या अडचणीचा घेतलेला गैरफायदा.. वर हे कमी का काय म्हणून मृतांच्या अंगावरचे दागदागिने पळविण्याचेही प्रकार घडले.. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यातलाच हा प्रकार नव्हे काय? अमानुषतेची इतकी हीन पातळी आपण गाठलीय? मला खरंच विश्वास ठेवावासा वाटत नाही.. 

असो.. या एका प्रसंगाने अनेकांना अनेक प्रकारचे धडे मिळाले... कदाचित या सगळ्याचा कदाचित चांगला परिणाम होईलही.. लोक बदलतील.. निसर्गाचा आदर करतील.. एवढीच एक अपेक्षा मी व्यक्त करू शकतो.. याहून अधिक काय बोलू अन्‌ काय लिहू?

...धन्यवाद आणि ॐ नमः शिवाय।

(समाप्त)

Wednesday

निसर्ग सांगतोय...पण आपण ऐकणार का? (भाग २)

उत्तराखंडचे कांड चालूच आहे... पुन्हा पाऊस, पुन्हा दरड कोसळणे, मदतकार्यात अडथळे इ. इ.

...जितका मी या घटनेवर विचार करतो, बघतो, ऐकतो तेवढे विविध पैलू डोक्याला मुंग्या आणतात. या एका घटनेने खूप साऱ्या मुद्द्यांना ऐरणीवर आणले आहे.

मला आठवते तसे साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वीपासून मी रोजचे वर्तमानपत्र वाचतोय. न चुकता हवामान, कमाल व किमान तापमान, आर्द्रता बघतो. उपग्रहाने पाठविलेले छायाचित्र, त्यातले ढग इ. जितके समजतील ते पाहतो.. बरीच वर्षे पाऊस अगदी नियमितपणे जूनच्या सुरूवातीला पुण्यात यायचा.. आणि संततधार पडायचा. टिपीकल ’पुणेरी’ पाऊस असे त्याचे वर्णन केले जायचे. साधारण २-३ महिने व ५००-६०० मिमी झाले की जायचा व मस्त थंडी यायची. पावसाळ्याआधी उन्हाळा असायचा, जो कधीही ३५-३६ सेल्सियसच्यावर सरकत नसे. वर बोनस थंडावा म्हणून उन्हाळ्यात गारांचा ’वळिवाचा’ पाऊसही पडे. त्यात इंद्रधनुष्य पाहणे.. कधीतरी एकापेक्षा जास्तपण असत.. ही सुद्धा आता आठवणच राहिली आहे..

Courtesy:Flickr


पण हळूहळू हा निसर्गक्रमसुद्धा ’मूडी’ झालाय. किंवा तो पूर्वीसारखा सौम्य न राहता दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. आताशा, एक ८-१० वर्षांपासून उन्हाळा नियमितपणे कडक असतो. ४०-४१ हे कमाल तापमान बऱ्याच वेळा नोंदविले जाते (जी पूर्वी एक स्वतंत्र बातमी असायची)..मे महिन्यात दुपारच्या वेळी बाहेर पडणे हे तुमच्या जीवाला घातक ठरू शकेल, इतकी तीव्रता त्या उन्हात असू शकते. वळिवाचा पाऊस उन्हाळ्यातून गायबच झालाय.. तो आजकाल उन्हाळ्यात न पडता, उन्हाळ्याच्या अगदी शेवटी येतो व एखादाच असा पाऊस होतो. पावसाळयाची तऱ्हा अजून निराळी. पावसाळा अजूनही येतो तसा वेळेवर. पण तो येतो, पहिले २-४ दिवस धुवांधार पडतो... इतका, की धरणे भरतात, पाणी सोडले जाते, नदीकाठच्या लोकांना धोक्याचा इशारा दिला जातो.. तिकडे गावाकडे शेतकरी खरीपाच्या पेरण्या करतात... अन्‌ मग पाऊस गायब होतो! एकदा त्याने दडी मारली की मग विचारू नका.. त्या केलेल्या पेरण्या करपेपर्यंत तो काही परत येत नाही... जूनच्या शेवटच्या आठवड्यानंतर ते जवळजवळ जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पुन्हा एक ’मिनी उन्हाळा’ येतो.. आणि मग पेरण्या वाया जाणार हे जवळपास नक्की झाले की मग ’तो’ परततो.. ऑगस्टमधे पुन्हा त्याचा धुमाकूळ... यावेळी तो इतका पडतो, की मावळात भाताची खाचरेपण वाहून जातात...पुण्यात खडकवासल्याचे, पानशेतचे सोडलेले पाणी ओंकारेश्वराला बुडवते.. रस्त्यांची खड्डे पडून चाळणी होते. हे सर्व होईपर्यंत त्याची ५००-६०० मिमीची सरासरी पूर्ण होते व तो आपल्याला टाटा करतो... अरे, सरासरी झाली, पण उपयोग काय? पहिल्या पेरण्या वाळून गेल्या व नंतरच्या वाहून गेल्या...२-४ धरणे भरतील एवढे पाणी वाहून गेले...आम्ही जागचे जागीच आहोत..
...तर असा पावसाळा ऑगस्टमधे संपतो.

हिवाळ्याचे तेच! पावसाळा व हिवाळा यांच्यामधे परत एक छोटा उन्हाळा येतो.. पूर्वी तो फक्त ऑक्टोबरपुरता मर्यादित होता, म्हणून त्याला "ऑक्टोबर हीट" म्हणायचे. आता त्याने आगेमागे हातपाय पसरून तो पार सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या सुरूवातीपर्यंत पसरलेला असतो. लहानपणी, मला लख्ख आठवते, दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नानाला पहाटे थंडीने कुडकुडत उठणे हा एक नकोसा प्रकार असायचा. आता दिवाळीत थंडी कुठे असते? थंडी पडते ती नोव्हेंबरच्या शेवटी... तीसुद्धा अगदी उपकार केल्यासारखी... पूर्वी १० सेल्सियच्या खाली नियमितपणे जाणारा पारा, आता १२-१५ लाच थांबतो.. अगदी २०१२ मध्येपण थंडी एक आठवडाभरच चांगली तीव्र होती.. त्यापेक्षा जास्त नाही... आणि रोज सकाळी ९-१० पर्यंत असणारे धुके कधीकधीच दिसते, तेपण ७-८ वाजेपर्यंतच..

हे सगळे वर्णन झाले पुण्याच्या हवामानाचे, पण मला खात्री आहे की असाच फरक सगळीकडेच झाला असणार आहे.

या सगळ्याचा अर्थ काय? तर निसर्ग बदलतो आहे.. असं म्हणतात, की तुम्ही निसर्गाला जे द्याल त्याच्या दसपट, शंभरपट तो तुम्हाला परतफेड करतो.. खरं आहे.. तुम्ही एक बी पेरलं की हजार दाण्यांचं कणीस तुम्हाला मिळतं.. तसंच तुम्ही त्याची काळजी केलीत तर तो तुमची दसपट काळजी घेईल. पण तुम्ही त्याच्यावर अत्याचार करत राहिलात तर तो त्याच प्रमाणात प्रत्युत्तर करेल.. सोडणार नाही.

हे आपल्याला जाणवत नाही, कारण आपण याची फिकीरच करत नाही. जोपर्यंत आपल्या जीवाला याची धग लागत नाही, तोपर्यंत आपण गप्प राहणार.."चलता है" आहेच. पण एक दिवस निसर्गाचा उद्रेक होऊन त्याने तांडव सुरू केले, की मग आपण जागे होतो, पळापळ होते, निष्पाप जीव जातात, काहीजण आयुष्यभराचे जायबंदी होतात.. काही हरवितात, लाखो-करोडोंची हानी होते.. तात्पुरती उपाययोजना केली जाते, आणि मग परत पहिले पाढे पंचावन्न सुरू...

उत्तराखंडचे पाऊसकांड किंवा मुंबईपुण्याच्या तत्सम घटना हा त्यातलाच तर प्रकार नाही? ही जाणीव आपल्याला झाली आहे का? हा प्रश्न निसर्गाने उभा केलाय.. पण उत्तर आपल्याला शोधायचे आहे. त्याने आवाज दिला आहे.. पण तो आपण ऐकण्याची शक्ती आणि इच्छा बाळगून आहोत का?
________
(क्रमशः)

Monday

निसर्ग सांगतोय...पण आपण ऐकणार का? (भाग १)

आधी कात्रज.. नंतर मुंबई.. आणि त्यानंतर उत्तराखंड... देशाच्या दोन अत्यंत भिन्न भूप्रदेशात घडलेल्या तीन घटना... परंतु, एकमेकींत काही साम्य दाखविणाऱ्या... साम्य ते कसले? तर, निसर्गाच्या रौद्रावतारापुढे माणसाच्या यःकश्चितपणाचे, आधी मग्रुरी करण्याचे, बेपर्वाईचे, नंतर सपशेल शरणागतीचे आणि एकाअर्थी मानवाच्या या अत्याचारांना निसर्गाने दिलेल्या उत्तराचेही..

(छायाचित्र: रॉयटर्सच्या सौजन्याने) (Photo courtesy:Reuters)

रोज या घटना कमीअधिक प्रमाणात घडतच आहेत.. आज इथे तर उद्या तिथे तर परवा आणखी कुठेतरी.. काही कळतात.. बऱ्याच कळत नाहीत..

निमित्त झाले वळिवाच्या केवळ एका तुफान पावसाचे आणि पुण्यात कात्रज बोगद्याजवळ (शिंदेवाडी) हाहाकार माजला... फक्त एक पाऊस??? फक्त एका पावसाने डझनावारी गाड्या ओढून नेल्या.. दोन निष्पाप जीव प्राणाला मुकले... का?? तर आमच्या रस्त्यांशेजारचे चर ते पाणी वाहून नेण्यास असमर्थ ठरले.

माहीम/मुंब्रा/दहिसरला तेच! फक्त एक पाऊस अन्‌ इमारत जमीनदोस्त.. २५-३० जण ठार (अधिकृत सरकारी आकडेवारी) आणि असेच कितीसेतरी जखमी..

उत्तराखंड प्रकरण तर अगदीच ताजे.. मान्सूनच्या नुसत्या सलामीने तिथे प्रलयसदृश परिस्थिती झाली. सरकारी आकडे काहीही सांगोत.. किमान १० ते १५ हजार मृत्यु व त्यापेक्षा जास्त जखमी व त्याहीपेक्षा जास्त विस्थापित अशी विदारक परिस्थिती या एका पावसाने तिथे आणली आहे. किमान २ ते ५ वर्षे हा भाग आता ’रिकव्हर’ होत राहील. पण तिथे नुकतीच आणखी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काय होणार हे आता देवालाच ठाऊक!

...जितका मी याच्यावर विचार करतो तितकं मला असं वाटत राहते की मानवाने निसर्गावर केलेल्या अपरिमित अत्याचारांचे हे निसर्गाने त्याच्या पद्धतीने  दिलेले उत्तर आहे.

अगदी नुकत्याच तिथे गेलेल्या लोकांपासून ते पिढ्यानपिढ्या तिथेच असलेल्या स्थानिकांपर्यंत सर्वजण हेच सांगतायत की डोंगरावर केलेली अनधिकृत बांधकामे, त्यांचे रस्ते, नदीपात्राला अगदी चिकटून बांधलेली हॉटेल्स, नदीपात्राला घातलेली बंधने, प्रवाहमार्ग बदलण्याचे प्रयत्न व त्यासाठी केलेली डोंगरफोड.. आणि हे आजचेच नाही, तर गेली कित्येक वर्षे चाललेले आहे..

आधी मुळात हिमालय हा मातीचा डोंगर! (आठवा.. ४थी-५वी चा भूगोल) हिमालयाच्या जागी फार पूर्वी "टेथीस" नावाचा समुद्र होता.. ज्यावेळी सर्व खंड निर्माण झाले, त्यावेळी भारतीय उपखंडाचा जमिनीचा ’तुकडा’ सरकत येऊन वरच्या चीन-तिबेट भूभागाला धडकला.. व या टेथीसच्या तळाशी असलेला गाळ वर उचलला जाऊन त्यातून आजच्या हिमालयाची निर्मिती झाली. (म्हणूनच, हिमालयात आजही मीठ सापडते.. ज्याला आपण ’सैंधव’ किंवा Rock Salt म्हणतो)

त्यामुळे, हिमालयातील बांधकामांना भक्कम पाया नाही.. सर्व चालले आहे ते या गाळाच्या ’अतिकठीण’ झालेल्या मातीच्याच भरोशावर.

जे "निसर्गहनन" हिमालयात झाले आहे.. तेच त्याहीपेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात, कितीतरी पट जास्त.. इथे मुंबईपुण्यात घडले आहे. कारण इथे आणखी जास्त पैसा आहे.. जागेला जास्त भाव आहे.. आणखी जास्त मस्ती व मग्रुरी आहे.. भयानक बेपर्वाई आहे... फक्त फरक असा की, हिमालय मातीचा बनलाय तर आपला सह्याद्री हा खरंच वज्रासारखा कठीण आहे.. कारण तो थंड झालेल्या लाव्हारसाचा बनला आहे...त्यामुळे आपण सुदैवी! आपल्याला फार कमी प्रमाणाचे नुकसान सहन करावे लागते.. अन्यथा आजपर्यंत कदाचित मुंबईची नामोनिशाणीही राहीली नसती. कारण एका बाजूला समुद्र व दुसऱ्या बाजूला (जर) मातीचा सह्याद्री, वर हे अत्याचार गेली कित्येक दशके या आपल्या तथाकथित "प्रगत" शहरांमधे अहोरात्र चालू आहेत. मग आपण दुसरे काय अपेक्षिणार ना?

आणि दुर्दैवाने हीच परिस्थिती देशाच्या इतर भागांमधूनही दिसून येते.

(क्रमशः)